रात्रीची ११ वाजता लाईट आली की सायकल घेतली अन जिथे बोरवेल चालू होत , तिथं
पाण्यासाठी निघालो..पण तिथं जाऊन सहज पाणी मिळणार नाही माहित होतं. तरीही नको नको
ते ऐकायचं आणि गप्प लाचार होऊन आपल्या घागरी अन हांडे भरायचं एवढंच लक्षात
होतं..तरीही घेतल्या घागरी निघालो पाण्याला ..आज पाणी मिळलं ह्या उद्देशाने
गेलो तर माझ्या आधीच चांगल्या ५-२५ घागरी लायनीत ठेवल्या होत्या..तरीही डोळं चोळत
झोप घालवत तू तू मै मै म्हणत माझा नंबर आला न तोपर्यंत पाणी गुळण्या मारू
लागलं.कशाबशा घागरी भरल्या अन आलो घराकडं." उठून बघतो तर काय स्वप्न मला पडलेलं..
घाम पुसत पुसत मी स्वतःला ,आयला खरंच पाण्यासाठी असला काळ
होता, ह्यावर माझा विश्वास बसेना.. मग मला एक एक गोष्ट आठवू लागली..जिथं
पाणी होतं तिथं पाणी भरायला मालकं नाक तोंड मुरडायचे.. मग रात्री १२-१ वाजता ते
झोपले की पाणी चोरून आणायला जायचं.. कधी विहिरीवर तर कधी बोरवेल जवळ.. इथं
पाण्यापुढे आपल्या जीवांचीही पर्वा नसायची. काळजी वाटली तर ती उद्याची.. कारण
उद्याच घरातलं सगळं सुरळीत पार पाडायचं असतं, त्यासाठी ही पाण्याची व्यवस्था आजचं
करून ठेवायची सवय लागली होती..
२००५ ला दुष्काळ पडल्यानंतर,तर सोलापूर बार्शी हायवेच्या लगत
एक विहीर होती. त्या विहिरीत मी आणि माझी बहिण अन आई एक घागर, बहीण
हंडा न मी छोटीशी कळशी घेऊन पाणी प्यायला विहिरीत उतरत असू..विहीर खोल नव्हती, पण
तिच्या एका कोपऱ्यात लहान झरा वाहत होता, त्या झऱ्याच पाणी बरोबर आपल्याच घागरीत
पडावं म्हणून सोबत एक प्लेट घेऊन जायचं.. त्या झऱ्याच पाणी प्लेटमध्ये अन
प्लेटमधलं पाणी घागरीत..एक घागर भरायला आरामशीर अर्धा एक तास लागत असे. हे फक्त
पिण्याच्या पाण्याचं..
पाण्याचा टँकर तर दिवसा फक्त मोकळा असलेलाचं
दिसायचा..भरलेला असला की नाहीतर त्याच्यावर नुसता राक्षसासारखा आम्ही तुटून
पडायचो.. गावातल्या घराजवळच्या आडाला इनमीन ४-५ रहाट , अन त्यावर रस्सी ( आम्ही
त्याला सोल म्हणत असू) आरामशीर ३० ते ४०.. म्हणजे १५*१५ व्यासाच्या वर्तुळात
म्हणजे त्या पाण्याच्या आडाभोवती पाच पंचवीस घागरी, तितक्याच सोला, अन तितकीच
मुंडकी.. कारण फक्त पाणी.. कधीकधी निम्म्या रात्री पाण्याचा टँकर येई ,
उन्हाळा असल्याने सगळेच बाहेर झोपत असायचे.. नुसतं कुणी चार घागरी अन त्यासोबत
सोल अन सायकल घेतली की तो कुठं जातोय न पाणी कुठंन आणतोय हे कळेपर्यंत जीवाला चैन
पडत नसायची.. मला आठवतंय आमच्या शेजारी राहणाऱ्या एका पोरानं रात्री पाणी
उपसून आणल्यामुळे रात्रीच्या २ वाजताच शिल्लक राहिलेला भात खाल्ला.. आणि अजूनही
तो ही गोष्ट विचारू शकत नाही हेही तितकंच महत्वाचं..
घरातील बायकांना पाण्यासाठी एवढ्या खस्ता खाव्या लागत असताना इथले
पुरुष मात्र आयाबायांवर सत्ता गाजवायला कमी जास्त करत नव्हते. गावातील प्रतिष्ठित
मंडळी अन ग्रामपंचायत तर नावालाच होती कारण निसर्गासमोर किंवा या दुष्काळासमोर
निष्प्रभ ठरले होते वाटतं.. मला अजून पण आठवतंय की एक बाई असं म्हणाली की, "
गड्यामाणसाचं काय जातंय , ते रोज मस आदबीत बाहिर पडत असतील, पण आम्हाला बायका
पोरांना पाण्यासाठी काहीही करावं लागतं.. " हे जणू गृहीत होतं. खरंच त्याकाळात
कुणालाही दुष्काळाची परिस्थिती अन अन तिची कारण शोधून काढायला वेळ नव्हता की
जबाबदारी झटकून टाकायची होती??
पण आजची परिस्थिती जरा वेगळी आहे, आणि सुखदायी ठरणारी आहे.. निसर्गराजाची किंवा
वरूनराजाची कृपा म्हणा गावाला आज मुबलक प्रमाणात पाणी आहे.. शेतीसाठी,
जनावरांसाठी, उद्योगधंद्यासाठी अन माणसासाठी....
ह्या पाठीमागचा उद्देश म्हणजे आम्ही काय पाणी तयार केलं का किंवा
कुठली योजना आणली का ,तर याचं उत्तर नाही.. आम्ही फक्त गेल्या ३-४ वर्षात आपल्यात
जेवढा काही पाऊस पडतो त्याला मुरवायचं अन जिरवायचं काम केलं..पाऊस पडायचा तेवढा
पडणार पण त्याला अडवायचं काम मात्र पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून झालं...
शेवटी निसर्गानं त्याची गरज आम्हाला दाखवली होती, म्हणून
त्याचं संवर्धन करणं भाग होतं, यातून कायतरी बोध घेणं गरजेचं होतं. त्या
परिस्थितीत एकत्रित प्रयत्नातून पानी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी
तसेच पाण्याविषयी तळमळ व कार्य करणाऱ्या लोकांनी खूप मदत केली, तसेच पाणी
फाऊंडेशनचे मार्गदर्शन या ठिकाणी अधोरेखित करावं लागणार आहे..
त्यावेळी पाण्याची टंचाई होती म्हणून जलसंधारण
केलं , अन एवढ्यावर थांबणार नाहीये ते काम, ते चालूच असणार आहे.. त्यासोबत आता या
कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची पण कमतरता भासत आहे..तर माझ्या गावकऱ्यांनो माझी एकंच
विनंती राहील की येत्या पावसाळ्यात जमेल तितकी एकट्यानं, समुहाने वृक्षारोपण करा,
त्याचं संगोपन करा...
पुढच्यास ठेच मागचा शहाणा...
Comments
Post a Comment